ठाणे : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीस बसला आहे. पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन ८ ते १० किमीपर्यंत दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच महामार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. महामार्गवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
१० किमीपर्यंत रांगा : ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरी भागात गेल्या ४८ तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावर ८ ते १० किमीपर्यंत लांबच रांगा लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना गेल्या ५ तासापासून वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्यातून गाडी चालवणे प्रवाशांना कठीण होऊन बसले आहे. एमएमआरडीए प्रशासनाने हा रस्ता बांधला आहे. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसला आहे.
महामार्गावर वाहतूक कोंडी : महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक कोंडी हटवण्यासाठी वाहतूक विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे भिवंडी गोदाम पट्टा असल्याचे लाखो अवजड वाहने येथे येतात. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर पाहता, वाहतूक कोंडी कशी सुटणार? असा सवाल केला जात आहे. एमएमआरडीने या महामार्गाचे काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. एमएमआरडीएने या रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचा दावा केला आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे असल्याने आज नाशिक मुंबईची वाट कमालीची बिकट झाली आहे.