मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक नाक्यावर वाहतूक पोलिसांनी धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांकडून पाच दिवसांत तब्बल ७ लाख ४२ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याची अशी माहिती काशिमीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी दिली.
मीरा भाईंदर शहरात वाहतूक विभागाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता वाहनांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे पार्किंगचा विषय, वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यात अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. याबाबत वाहतूक विभागांनी कारवाईचा बडगा उचलत २७ ते ३१ ऑक्टोबर या पाच दिवसांत ७ लाखापेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. यामध्ये ९३० दुचाकी, ३०६ तीनचाकी, ७१९ चारचाकी, ७१ कचरागाडी अश्या एकंदरीत २०२६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, तसेच लोकांचा प्रवास सुखाचा व्हावा, म्हणून जास्त लक्ष देण्यात येत आहे. वाहनचालकांनी शिस्तबद्ध, नियमांचे पालन केले पाहिजे, जे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करतील त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती काशी मीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांनी दिली.