ठाणे - भिवंडी लोकसभेतील भाजपचे आमदार कपिल पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षातील श्रमजीवी संघटनेच्या हजारो आदिवासी कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांनी केलेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन ते अडीच तास भर उन्हात त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या.
कपिल पाटील यांनी भिवंडीतील शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत भिवंडी मतदारसंघातील शहापूर मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातून आलेल्या हजारो आदिवासी महिला पुरुष मंडळींचा समावेश होता. त्यानंतर भिवंडी प्रांत कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनाही वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला.
आज दुपारच्या कडकडीत उन्हात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे वातावरण चांगलेच तापल्याचे पाहवयास मिळाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपच्या वतीने चार दिवस आधीच शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे शक्ती प्रदर्शनामुळे भिवंडी न्यायालयात जाणारा दोन्ही बाजूचा मार्ग बंद करण्यात आला होता. यामुळे न्यायालयाच्या सकाळच्या सत्रातील कामकाजावर मोठा परिणाम जाणवल्याचे दिसून आले आहे. त्यातच वाद्याच्या प्रचंड गोंगाटाचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागला.