ठाणे(मीरा भाईंदर): सम-विषम पद्धत रद्द करून नियमित दुकाने उघण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी मीरा भाईंदरमधील व्यापारी वर्गाने महानगरपालिकेसमोर ठिय्या मांडला. मनपा उपायुक्त महेश वरूडकर यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी त्यांना निवेदन दिले. नियमित दुकाने उघण्यास तत्काळ परवानगी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला.
लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक नियम लागू करण्यात आले होते. आता टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे. प्रशासनाने शहरातील दुकाने सम-विषम नियम पद्धतीने उघडण्यास परवानगी दिली. मात्र, दुकाने कायमस्वरूपी उघडण्यास परवानगी द्या, अशी मागणी अनेक दिवसांपासून व्यापारी करत आहेत. प्रशासनाकडून याला अधिकृत परवानगी मिळत नसल्याने व्यापारी वर्गाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
कोरोनाच्या संकटामुळे शहरातील व्यापारी वर्गाला गेल्या पाच महिन्यांपासून दुकाने बंद ठेवावी लागली. याचा सर्वांना मोठा आर्थिक फटका बसला. दुकानांचे भाडे व उदरनिर्वाहासाठी आता नियमित दुकाने दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र, मनपा कर्मचारी या दुकानदारांना नाहक त्रास देत आहेत. अनेक ठिकाणी दंडाच्या नावाखाली व्यापारी वर्गाकडून पैसे वसूल केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे.
आर्थिक अडचणींमुळे घर चालवणे मुश्कील झाले आहे. त्यात महानगरपालिकेचे कर्मचारी दमदाटी करत दुकाने बंद पाडतात. अनेक ठिकाणी व्यापारी वर्गाकडून पैसे वसूल केले जात आहेत. हे थांबले पाहिजे त्यामुळे आम्ही आज अधिकाऱ्यांची भेट घेतली. सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापारी महेंद्र कांबळे यांनी प्रशासनाला दिला.