ठाणे - महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनो केंद्र व राज्य सरकारने लागू केलेला जीएसटी कर भरू नका? मग बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींही तुमच्या दारात येतील. असा अजब सल्ला पंतप्रधान मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे. प्रल्हाद मोदी हे उल्हासनगरमध्ये आयोजित केलेल्या व्यापारी ट्रेड असोसिएशनच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लहान बंधू प्रल्हाद मोदी हे ऑल इंडिया फेयर प्राइज शॉप एसोसिएशनचे उपाध्यक्ष असून उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी ते आले होते.
खुल्या व्यापारासाठी दिवंगत राजीव गांधीवर टीका -
उल्हासनगर ट्रेंड असोसिएशनने यांच्या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांना संबोधित करताना प्रल्हाद मोदी म्हणाले कि, इंधनाचे वाढलेले दर हे अंतरराष्ट्रीय मार्केट नुसार ठरते, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाले आहे. त्यामुळे खुल्या मार्केटनुसार चालायचे असेल तर हे सहन करावेच लागेल असे देखील प्रल्हाद मोदी म्हणाले.
कोरोना काळातील व्यापाऱ्यावरील गुन्हे मागे घ्या -
आमच्या मागण्या केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही मोदींना आमंत्रित केल्याचे व्यापारी संघटनेने स्पष्ट केले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल उल्हासनगरात बहुतांश व्यापाऱ्यांवर पँडेमिक अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर राज्यांनी हे गुन्हे मागे घेतले असून, महाराष्ट्रातही ते मागे घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.