ठाणे - जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुबलक नैसर्गिक साधन संपत्ती असून पावसाळ्यात विविध ओढ, धबधबे जिवंत होत असतात. अशात राज्यात प्रसिद्ध असलेल्या 'अशोका' धबधाब्यासह निसर्ग पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई उपनगरतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या पर्यटनामुळे ठाणे जिल्ह्यात एक वेगळी स्थानिकांची अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. मात्र या नैसर्गिक पर्यटन स्थळांवर झालेल्या काही दुर्घटनांनंतर खबरदारीचे उपाय योजन्याऐवजी जिल्हा प्रशासनाकडून या निसर्ग पर्यटन केंद्रांवर फिरण्यास थेट बंदी घातली आहे. या बंदीची गेल्या चार वर्षांपासून परंपरा सुरू असून यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.
इको टुरिझमचा दर्जा : शहापुरातील कुंडणचा धबधबा सध्या पर्यटकांना चांगलाच भावला असून या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे तर अशोक धबधब्यालाही पर्यटकांची चांगलीच पसंती आहे. ही दोन्ही ठिकाणे दुर्गम आदिवासी भागात असून संपूर्ण लोकवस्तीत आदिवासी बांधवांची संख्या अधिक आहे. या परिसरात पावसाळय़ात भातलागवडीनंतर रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट असतो. त्यामुळे या केंद्रामुळे या स्थळांना पर्यटन केंद्र व इको टुरिझमचा दर्जा मिळाल्याने या परिसरात पर्यटकांचा चांगलाच ओघ वाढेल. त्या निमीत्ताने येथील स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होईल. या दृष्टीने जुलै २०१७ मध्ये धबधब्याला पर्यटन स्थळाचा व अशोक धबधबा इको टुरिझमची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या भागात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
३२ लाखांचा निधी खर्च : विशेष म्हणजे अशोक धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल संपत्ती असून पावसाळ्यात विविध प्रकारच्या रानभाज्या, फळे, फुले व जंगलातील विविध उत्पादिते उपलब्ध असतात. त्यांनाही या निमित्ताने बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी २०१८ साली याठिकाणी ३२ लाख रुपये निधी पर्यटन विभागाकडून मंजुरी घेऊन या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग कच्चा रस्त्यापासून पुढे दरीपर्यंत बिकट होता. मात्र निधी खर्च करून अडीचशे मीटर अंतरापर्यंत सुमारे २५० ते ३०० पायऱ्या बांधण्यात आल्याने धबधब्याची वाट सुकर झाली आहे. निसर्गरम्य वातावरणात धबधब्याच्या तुषारात चिंब होताना पर्यटकांनी बेभान न होता मनमुराद आनंद लुटण्याची गरज आहे.
५० फूट उंचीवरून धबधब्याचे मोहक रुप : कसारा घाटातील हिरवी वळणे चढतांना कसाऱ्या पासून १५ किमीवर वहीगांव फाटकात दादर नावाचा तिठा लागतो. या तिठ्यावरुन उतरून पुढे गावातून पायी अशोका या धबधब्यावर पोहोचता येते. चालतांना वाटेत विस्तीर्ण हिरवीगार शेती लागते. समोरील दाट धुक्याच्या दुलईतले डोंगर आणि डोंगराच्या पायथ्याखालील विसावलेले ओलाचिंब गांव पाहताना एखाद्या निसर्ग चित्रासारखेच भासते. पुढे सरळ पश्चिमेस गेल्यावर गावात बांधण्यात आलेला मोठा बंधारा पहावयास मिळतो. या बंधाऱ्या जवळ हे सारे जलप्रवाह एकत्र येऊन पुढे तो प्रवाह मोठा होऊन जवळील खोल दरीत कोसळतो. हा प्रवाह सुमारे ४० ते ५० फूट उंचीवरून धबधब्याचे रुप घेऊन कोसळतो.
...म्हणून पडले अशोका नाव : २००१साली प्रदर्शित झालेल्या अशोका या हिंदी चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान व करिना कपूर यांच्या एका गीताचे चित्रीकरण मध्य प्रदेशमधील पंचमढीच्या ‘अप्सरा विहार’ नावाच्या धबधब्याभोवती झाले. हा धबधबा इगतपुरीमधील विहीगावच्या धबधब्याशी साम्य असलेला आहे. अशोकामधील ‘सन सना ना..’ या गीतामधील ‘अप्सरा विहार’ हा धबधबा हुबेहूब विहीगाव धबधब्यासारखा दिसतो. कातळावरून कोसळणारे पांढरे शुभ्रपाणी आणि आजूबाजूला असलेली गर्द हिरवाईचा हा परिसर एकसारखाच भासतोयमुळे या धबधब्याला ‘अशोका’ असे नाव पडले असावे.
अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक अपघात : मागील चार वर्षांपासून अशाच पद्धतीने जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात येत असून या वर्षीही या पर्यटन स्थळांवर जाण्यास मिळणार नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार झाला आहे. ठाणे जिल्ह्यासह पुणे , नाशिक मुंबई, उपनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांतून पर्यटक येत असतात. त्यामुळे अनेकदा अतिउत्साही पर्यटकांमुळे आतापर्यत अनेक बळी जाऊन जीवितहानी घडल्याने जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - Ahmedabad Rain: अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस; शहरात अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती