ठाणे - शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार असल्याचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी म्हटले आहे. ते भिवंडी तालुक्यातील भिवंडी गावातील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हा प्रकल्प स्प्रेडिंग हॅपिनेस इंडिया फाऊन्डेशनतर्फे “बिल्डिंग सस्टेनेबल फ्युचर” कॅम्पेनच्या माध्यमातून चालवला जात आहे. याअंतर्गत ग्रामीण परिसरातील 100 शाळांना सुसज्ज डिजिटल क्लासरूम आणि सोलार लायटिंग सिस्टीम उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सौरऊर्जा प्रकल्प पुरविण्यासाठी आम्ही आतापर्यंत 500 शाळांचा समावेश केला आहे. यात 60,000 ग्रीन अम्बेसिडर निर्माण केले आहेत. तसेच यासाठी एसएचआयएफने डिजिटल लर्निंग लॅब स्थापन केली आहे. त्यामध्ये इंटरनेटची सोय आहे. छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे या लॅबला हरिता, विश्वासार्ह ऊर्जा पुरवली आहे. हा प्रकल्प देशातील 100 शाळांपर्यंत विस्तारला जाणार आहे, असे सचिन यांनी सांगितले.
एसएचआयएफने विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी श्नायडर इलेक्ट्रिकच्या ‘कॉन्झर्व्ह माय प्लॅनेट’ या प्रमुख उपक्रमाद्वारे, शालेय विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समावेश करण्याचे ठरवले आहे. यात विद्यार्थ्यांना शाश्वतता, हवामानातील बदल, ऊर्जा आणि मौल्यवान नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन याविषयी विद्यार्थ्यांना माहिती आणि जाणीव असावी, तसेच या बाबतीत “ग्रीन अम्बेसिडर” बनून पुढाकार घ्यावा व आदर्श निर्माण करावा, असा हेतू यामागे असल्याचे सचिन यांनी सांगितले. तर आजही असंख्य शाळामंध्ये विद्यार्थी सुविधेपासून वंचित आहेत. त्यांना सुविधा पुरविण्याची गरज आहे. यासाठी आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत, असे ते म्हणाले.
हेही वाचा - श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर धार्मिक विधी न करता शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
यापूर्वी पहिल्या टप्प्यामध्ये, ग्रामीण इलेक्ट्रिफिकेशन प्रकल्पाला लक्षणीय यश मिळाले. त्यामध्ये 25,000 हून अधिक घरांना सौरऊर्जा पुरवण्यात आल्याचेही तेंडुलकर यांनी सांगितले. यावेळी श्नायडर इलेक्ट्रिक इंडियाचे झोन प्रेसिडेंट व व्यवस्थापकीय संचालक अनिल चौधरी यांच्यासह एसएचआयएफचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - 'भाजपला मेहबुबा मुफ्ती, पासवान चालतात; त्यांनी आम्हाला सावरकर शिकवू नये'
दरम्यान, सचिन तेंडुलकर आपल्या शाळेत येणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी सचिन येताच 'सचिन, सचिन' अशी आरोळी ठोकत त्यांचे स्वागत केले. तर सचिन तेंडुलकरांनीही विद्यार्थ्यांना आठवण रहावी म्हणून त्यांच्या सोबत हितगुज करत सेल्फी काढल्या.