नवी मुंबई - भाजपच्या दोन दिवसीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत असल्याने अधिवेशनाला महत्व प्राप्त झाले आहे. आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सुरुवात झाली असून, यात पक्षाच्या विस्तारकांसोबत पाटील यांनी संवाद साधला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर पक्षातल्या काही नाराज नेत्यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले होते. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिला नाही. मात्र, आता या अधिवेशनात नड्डा आपली काय भूमिका मांडतात याकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाला आमदार, खासदारांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित आहेत.
भाजपचे चंद्रकांत पाटील हे या अधिवेशनात जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तसेच, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचा समारोप करणार आहेत. भाजप राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्यासह पक्षाचे विविध नेते या अधिवेशनाला त्यांच्या सत्रानुसार उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - जळगावमध्ये आज शरद पवार-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित
हेही वाचा - ..तर बायको मला घरातून हाकलूनचं देईल