ठाणे - विविध प्रकारच्या दुचाक्या बनावट चावीने लंपास करीत बाईक चालवण्याची आपली हौस भागविणाऱ्या त्रिकुटाला उल्हानसागर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. दुचाकी चालवण्याची हौस त्यांना थेट कोठडीत घेऊन गेली. या त्रिकुटांकडून चोरीला गेलेल्या तब्ब्ल 10 दुचाक्या हस्तगस्त केल्या आहे. लाला रियाज मोहम्मद मणियार (वय १८) असे आरोपीचे नाव आहे.
उल्हासनगर कॅम्प नंबर दोनच्या खेमानी परिसरात एका खासगी रुग्णालयाबाहेर विनय कुमार यादव त्यांनी 30 ऑक्टोबर रोजी आपली दुचाकी पार्क केली होती. काही मिनिटांत ते परत आल्यानंतर त्यांची दुचाकी काही तरुण बनावट चावीच्या मदतीने सुरू करताना दिसले. त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दादागिरी करत त्यातील एकाने त्यांच्यावर चाकूने वार केले आणि दुचाकी घेऊन ते पसार झाले. या संदर्भात विनय कुमार यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आतापर्यत 10 दुचाक्या जप्त -
उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तपास सुरू केला. पोलीस तपासादरम्यान उल्हासनगरमधील कामगार रुग्णालयाजवळ एक दुचाकीस्वार तरुण संशयास्पद हालचाल करत असताना पोलीस पथकाला दिसला. त्याला ताब्यात घेतले असता, त्यानेही दुचाकी चोरीची असल्याचे कबूल केले आणि यात दोन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी त्यांचाही शोध घेऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. तिघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा दुचाकी लंपास केल्याचे समोर आले.
अल्पवयीन चोरट्यांची बालसुधारगृहात रवानगी -
पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्याकडून 10 दुचाक्या जप्त केल्या आहेत. तर आणखी काही दुचाक्या त्यांनी लंपास केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्यातील लाला रियाज मोहम्मद मणियार या आरोपीची रवानगी पोलीस कोडठीत करण्यात आली आहे. तर त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर या त्रिकुटाने आणखी किती दुचाकी चोरी केल्यात याचा देखील पोलीस तपास करण्यात येत असल्याची माहिती उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांनी दिली आहे.