ठाणे - अंबरनाथ पश्चिम परिसरात असलेल्या सर्वोदयनगर मधील भवानी नावाच्या सराफाच्या या दुकानावर रविवारी (दि. 10 जाने.) दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चार दरोडेखोरांनी सराफाच्या दुकानावर दरोडा टाकून 25 तोळे सोने घेऊन दरोडेखोर पळून गेले. पळून जाताना दुकान मालकासह 2 कामगारांनी विरोध केला असता, या दरोडेखोरांनी त्यांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार केला. शिवाय धारदार चाकूनेही हल्ला करत चारही दरोडेखोर फरार झाले. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आता अंबरनाथ पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या चारही दरोडेखोराचा शोध सुरू केला आहे.
विरोध करताच गोळीबार अन् चाकू हल्ला
अंबरनाथच्या चिखलोली परिसरातील सर्वोदयनगरमधील तुलसी सानिध्य कॉम्प्लेक्समधील भवानी नावाचे सराफाचे दुकान आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला मोटार सायकलीवरून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी दुकानातील सोन्याचे दागिने पिस्तूल, चाकूचा धाक दाखवून लुटमार सुरू केली. त्यावेळी दुकान मालक व कामगारांनी प्रतिकार करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्याकडील चाकूने केलेल्या हल्ल्यात दुकानातील तीन जण जखमी झाले. त्यांनतरही आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुकानातील अंदाजे 25 तोळे सोन्याचे दागिने चोरून फरार झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
घटनेनंतर लगेच शहरात नाकाबंदी
भवानी सराफ दुकानाबाहेर एक पिस्तूल, निकामी काडतुसे, चाकू आणि चपला टाकून दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलीस उपयुक्त विनायक नरळे, अंबरनाथचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. घटनेनंतर लगेच शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहे.
घटनेत जखमी झालेल्या लक्ष्मण सिंग (वय 30 वर्षे), वसंत सिंग (वय 26 वर्षे), भैरव सिंग (वय 22 वर्षे) या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
हेही वाचा - अंबरनाथमध्ये सराफा दुकानावर दरोडेखोरांनी केला अंदाधूंद गोळीबार
हेही वाचा - उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नागरिकांचा पुढाकार; शासकीय यंत्रणा झोपेत