ठाणे - इस्लाम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याचा रोजा शहापुरातील तीन चिमुकल्यांनी पूर्ण केला आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन आणि रखरखीत उन्हात तब्बल ३० दिवस दररोज १४ तास अन्न- पाण्याशिवाय या तिघांनी रोजा पूर्ण केला. तला आसीफ शेख (वय ७), हुरीया दिलखुश शेख (वय ८) आणि ईशल आसीफ शेख (वय ८) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत.
इस्लामिक कॅलेंडरनुसार नववा महिना रमजान हा इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो. भारतातील रमजानचा कालावधी केव्हा सुरू होतो, हे चंद्राच्या दिसण्यावर अवलंबून असते. त्यानुसार यावर्षी २४ एप्रिलपासून रमजानचा कालावधी सुरू झाल्याचे सांगण्यात येते. धर्माप्रती श्रद्धा असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांकडून ३० दिवस उपवास करून रोजा पूर्ण केला जातो.
शहापुरात मुस्लीम बांधवांबरोबर तीन चिमुकल्यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे. शहापुरातील पठाणवाडा येथील या तीन चिमुकल्यांनी तब्बल ३० दिवस दररोज पहाटे पाच ते संध्याकाळी सात असे चौदा तास अन्नाचा कण आणि पाण्याचा घोट न घेता दिवसभर उपवास करून रोजा पूर्ण केला आहे. एवढ्या कमी वयात या चिमुकल्यांनी रोजा पूर्ण करून धर्माप्रती श्रद्धा व्यक्त केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.