ठाणे - कोनगाव पोलिसांनी फिल्मी स्टाइलने होंडा सिटी कारचा पाठलाग करून कारमधून 800 किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून दोन जण फरार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघ्या जवळील तळवली येथून हे गोमांस मुंबईमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद आदिल सय्यद इशाक (वय 22), मुजाहीद अब्दुल रहमान शेख (वय 20), युनूस इसाक कुरेशी (वय 34) सर्व राहणार मुंबई मानखुर्द अशी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याशिवाय गाईंची कत्तल करणारा नवमान कुरेशी व ते विकत घेणरा मानखुर्द येथील गोमांस विक्रेता इर्शाद कुरेशी या दोन्ही आरोपींना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील पिंपळास रेल्वे ब्रिजजवळ रात्रीच्या सुमारास गोमांसने भरलेली सिटी होंडा कार येणार असल्याची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी या कारचा फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. पिंपळास रेल्वे ब्रिजवर गाडी अडवून सुमारे 20 हजार रुपये किंमतीचे 800 किलो गोमांस जप्त करण्यात आले. आरोपींकडे असलेली होंडा सिटी गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन सूर्यवंशी करीत आहेत.