ठाणे - डोंबिवलीत शेलारनाका परिसरात रिक्षा बाजूला घेण्याच्या वादातून तिघांनी प्रतीक गावडे या तरुणाची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर काही तासातच डोंबिवली पोलिसांनी झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ याला अटक केली, तर चंद्या जमादार, रवी लगाडे हे पसार झाले होते. अखेर कल्याण गुन्हा शाखेने अवघ्या २४ तासात प्रतीकची हत्या करणाऱ्या रवी लगाडे आणि चंद्रकांत जमादार यांना अटक करून रामनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रस्त्यात उभी असलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून प्रतीक गावडे, बाली जयस्वार, निलेश धुणे या तिघांवर शस्त्राने हल्ला केल्याची घटना शेलार नाका डोंबिवली येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रतीक गावडेचा मृत्यू झाला तर, बाली जयस्वार, निलेश धुणे या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. हल्लेखोर झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ, चंद्या जमादार आणि रवी लगाडे हे तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर तसेच टिळक नगर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने वार करणे, दहशत माजवणे, रॉबरी करणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
डोंबिवली पोलिसांनी काही तासातच झागऱ्या उर्फ रमेश घोरणाळ याला अटक केली. तर, या गुन्ह्यांचा समांतर तपास कल्याण गुन्हे शाखा करत होती. तपासादरम्यान दोघे आरोपी कचोरेगांव ९० फीट रोड लगत गावदेवी मंदिराच्या मागील बाजूस लपून बसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली. जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचला. मात्र, आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने ते ९० फिट रोडने कल्याण पत्रीपुलकडे पळाले. दरम्यान, पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने रवी लगाडे आणि चंद्रकांत उर्फ चंदू जमादार या दोघांना पकडले.
हेही वाचा - भिवंडीतील मदर डेअरीमध्ये स्थानिकांना रोजगार द्या; ग्रामस्थांचे आंदोलन
या दोन्ही आरोपींना पकडून पुढील कारवाई करिता डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सपोनि दायमा, पोउपनिरी नितीन मुदगुन, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, मंगेश शिर्के, अरविंद पवार, निवृत्ती थेरे, सचिन साळवी, प्रकाश पाटील, राहुल ईशी हे पोलीस आधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही मोहिम राबवली.
हेही वाचा - विधवा मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून, वयोवृद्ध आरोपी गजाआड