ठाणे: एकीकडे खाद्यतेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सर्वसामान्य नागरिकांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे तेल माफिया रोजच्या जेवणात वापरातील आणि जीवनावश्यक वस्तू म्हणून खाद्यतेलात भेसळ करून ते खाद्यतेल बाजारात विक्री करीत होते. खळबळजनक बाब म्हणजे, डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. याच पाठोपाठ आता हलक्या दर्जाच्या खाद्यतेलाच्या डब्यावर नामांकित कंपनीचे लेबल लावून मोठ्या प्रमाणात डोंबिवली शहरात विक्री होत असल्याची बातमी रामनगर पोलिसांना मिळाली होती.
भेसळयुक्त खाद्यतेल कुठे तयार होते? भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत होत असून गेले काही दिवसांपूर्वी रामनगर पोलिसांनी डोंबिवली पूर्व येथील एका तेलाच्या बड्या व्यापाऱ्याला एका गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्यावेळी या व्यापाऱ्याने मुंबईतील एका होलसेल विक्रेत्याने भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा साठवून ठेवल्याची माहिती रामनगर पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे भेसळयुक्त खाद्यतेल नेमके कुठे तयार करण्यात येते याचा शोध रामनगर पोलीस घेत होते.
बनावट खाद्यतेलाचा साठा हस्तगत: रामनगर पोलिसांना १२ जून रोजी गुप्त बातमीदाराकडून मुंबईच्या मस्जिद बंदर भागातील एका गोदामात भेसळयुक्त खाद्यतेलाच्या डब्यांवर नामांकित कंपनीचे लेबल लावत असल्याची माहिती मिळाली. याआधारे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस हवालदार विशाल वाघ, निलेश पाटील, जयपाल मोरे, नितीन सांगळे यांनी मस्जिद बंदर भागातील त्या गोदामावर छापेमारी केली. दरम्यान ५ लाख ४५ हजार किमतीचा बनावट खाद्यतेलाचा साठा हस्तगत करत तीन तेल माफियांना ताब्यात घेतले.
त्रिकुटाला पोलीस कोठडी: रामनगर पोलिसांनी अटक केलेल्या दीपक जैन, तारिक मेहमूद अतिक अहमद आणि दिलीप मोहिते या आरोपींना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अटक तेल माफियांचे आणखी किती ठिकाणी अश्या बनावट खाद्यतेलाची गोदामे आहेत, याचा तपास रामनगर पोलीस करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.