मीरा भाईंदर(ठाणे) - मिरा-भाईंदर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग सुरू असतानाच लॉकडाऊनच्या कालावधीत मद्याची तस्करी करणाऱ्या तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह अटक केली आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या आठवड्यातील विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे.
याप्रकरणी मिरा-भाईंदर शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे पोलीस अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली विजय थोरात, किरण पवार, नरेंद्र थोरात, शिपाई सानप व निजापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मीरा भाईंदर परिसरातील काशिमिरा नाका, मीरा रोड, शिवार गार्डन मिरा-भाईंदर रोड तसेच दहिसर चेक नाका येथील सागर हॉटेल समोर 70.17 लिटर देशी दारू जप्त करण्यात आली असून त्याचबरोबर एक रिक्षा, एक कार व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत दोन लाख 80 हजार 484 रुपये इतकी आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.