ठाणे - एका नामांकित रेडिमेड कपड्यांचे गोडाऊन फोडून तब्बल 25 लाखांच्यावर जीन्स पॅन्ट, टी-शर्ट, शर्ट चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. पडघा पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील वाशेरे गावाच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी, पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासाअंती पाच दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांच्याकडून दहा लाखाचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील वाशेरे गाव येथील अंतरिक्ष कंपनीच्या गोदामावर पंधरा दिवसांपूर्वी अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. खिडक्यांच्या काचा व दरवाजे फोडून गोडाउनमध्ये प्रवेश करत तब्बल 25 लाख 85 हजार 836 रुपये किंमतीचे स्पायकर कंपनीचे जीन्स, टी शर्ट, जॅकेट, शर्ट गारमेंट लंपास केले होते. त्यांनतर या घटनेची नोंद पडघा ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांच्या पोलीस पथकाला या पाच दरोडेखोरांच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळण्यात यश आले आहे. दरोडेखोरांनी चोरलेल्या मुद्देमालापैकी दहा लाख किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
संदीप अनंता दळवी (वय 19 रा. देवरुंग), निकेश जनार्दन पाटील (वय 18 रा. आमणे), प्रशांत गजानन केने (वय 23 रा. कोंढरी), रंजीत विश्वनाथ पाटील (वय 19 रा. देवरुंग) आणि आकाश बाळाराम जाधव (वय 29 रा. दूळखाडी) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पाचही दरोडेखोरांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.