नवी मुंबई - कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पनवेल महानगरपालिका आणि तालुका हद्दीतील गावांनी बाहेरील लोक गावात येऊ नये म्हणून गावाच्या सीमा बंद करून टाकल्या आहेत. कोरोना व्हायरसवर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्रामस्थांच्या माध्यमातून सांगण्यात आले.
हेही वाचा - कपिल देवचं होम ग्राऊंड आता होणार कारागृह!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी स्वतःहून उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पनवेल तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी बाहेरील व्यक्ती, फेरीवाले यांना ग्रामपंचायत क्षेत्रात प्रवेश करण्यास मज्जाव केला आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील कोपरा गावातही गावकऱ्यांनी सर्व सीमा बंदिस्त करीत बंदीचा बोर्ड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे.
तसेच या तालुक्यातील नेरेपाडा गावातील तरुणांनी एकत्र येऊन गावात जाणारा आणि येणारा रस्ता ३१ मार्च पर्यंत बंद केला आहे. त्यामुळे बाहेरील कुणीही व्यक्ती गावात येऊ नये अशी विनंतीही नागरिकांना करण्यात येत आहे. नेरे पाडा गावातील व्यक्तींना आपल्या कोणत्याही नातेवाईकांना गावात येऊ द्यायचे नाही, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.