ठाणे - क्वारंटाईन केंद्राच्या इमारतीतून एका संशयित रुग्णाने उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-भिवंडी रोडवरील राजनोली नाक्यावर असलेल्या टाटा आमंत्रण येथील टोलेजंग इमारतीत असलेल्या क्वारंटाईन केंद्रात घडली आहे. याप्रकरणी त्या संशयित रुग्णाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यावर आळा घालण्यासाठी शासनाच्यावतीने भिवंडी तालुक्यातील कल्याण-भिवंडी रोडवरील असलेल्या राजनोली नाक्यावर टाटा आमंत्रण येथील टोलेजंग इमारतीत क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आले. या केंद्रात ठाणे जिल्ह्यातील विविध शहरी व ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. असाच एक मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीला १८ एप्रिलला या क्वारंटाईन केंद्रात दाखल केले होते. मात्र, रविवारी दुपारच्या सुमाराला कोणाचे लक्ष नसताना हा व्यक्तीने इमारतीच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत बाविस्कर यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात कोविड १९ उपाय योजना २०२० चे नियम ११ व साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४, व आपत्ती व्यवस्थापक अधिनियम २००५चे कलम ५१ (ब) सह भादवी. कलम १८८, २७१,३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यवंशी करीत आहेत.