ठाणे - कृषी पथकासह पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील मौजे वळगांव हद्दीतील पद्मावती कंपाऊंडमधील रॉयल वेअर हाऊस येथील गोदामावर छापा टाकून निमकोटेट खताचा साठा जप्त करून गोदामाला सील केले होते. मात्र, गोदाम मालकांनी जप्त खताचा साठा परस्पर चोरून विक्री केल्याची घटना समोर आली. त्यामुळे गोदाम मालकांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदाम मालक बापूराव नारायण भोसले व अमित झंवर, असे गुन्हा दाखल झालेल्या गोदाम मालकांची नावे आहेत.
या दोघा आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमताने शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारा निम कोटेट युरिया खताच्या प्रत्येकी 50 किलो वजन असलेल्या सुमारे 1 लाख 90 हजार 91 रुपये किंमतीच्या 121 गोणींचा (पोते) साठा वळ येथील वेअर हाऊस आर / एफ - 18 या गोदामात साठवून ठेवला होता. या खताचा वापर औषध, रंग निर्मिती व दूध भेसळीसाठी केली जात असल्याची माहिती माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी 25 नोव्हेंबर रोजी छापा टाकून येथील खताचा साठा जप्त करून खताचा नमूना तपासणीसाठी विशेष रसायन शास्त्रज्ञ, खत नियंत्रण प्रयोग शाळा, नाशिक येथे पाठविला होता.
हेही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावर धावत्या एसटी बसची चाके निखळली; ५७ प्रवासी बचावले
त्यामध्ये प्राप्त झालेल्या अहवालात जप्त केलेले खत हे शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारे निम कोटेट युरिया खत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कृषी निरीक्षक नितेंद्र पानपाटील हे गुण नियंत्रण अधिकारी राजेंद्र कांबळे यांच्यासह गुरुवारी वळ येथील खताचा जप्त केलेल्या साठा पाहणीसाठी गोदामात गेले होते. त्यावेळी त्यांना गोदामातून खताच्या गोणी गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याबाबतची चौकशी केली असता खताच्या गोणी चोरून नेल्याचे समजले. त्यामुळे गोदाम मालक बापूराव भोसले आणि अमित झंवर या दोघां विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम व भा. दं. वि. 379, 420, 34 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील करीत आहे.
हेही वाचा - कचऱ्याच्या डब्यात धुतात चहाचे कप; ठाणे रेल्वे स्थानकातील ओंगळवाणा प्रकार