ठाणे : वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका (CIDCO and Thane Municipal Corporation) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे क्लस्टरच्या प्रत्यक्ष अमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या वर प्रतिक्रिया देताना नागरिकांनी .फक्त घरे मिळावी यावर राजकारण होऊ नये, असेच सुचवले आहे.
काही वर्षांपूर्वी वागळे भागातील साईराज इमारत पत्यासारखी कोसळली आणि निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला, मुंबईमध्ये ज्या प्रमाणे घराच्या किमती वाढत आहेत ते पाहता सर्वसामान्य लोक मुंबई मध्ये घर घेऊच शकत नाही, मग पर्याय काय तर ठाणे शहर ! मग त्यात आपण जे घर घेत आहोत ते अनधिकृत आहे कि अधिकृत हे न पाहता आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये आपले हक्काचे घर मिळतंय ना... एवढीच माफक अपेक्षा या लोकांची होती... आणि लोकांनी ठाण्यात घरे घेण्यास सुरवात केली, आणि आपल्या हक्काच्या घरात त्यांच्या गोडीगुलाबीचा संसार सुरु झाला... त्यातच काही वर्षांनी अचानक साईराज सारखी किंवा मुंब्रा भागातील लकी कंपाउंड सारखी इमारत कोसळते आणि अनेक जण मृत्युमुखी पडतात, जे वाचले आहेत त्यांना पुन्हा घर ही मिळत नाही कारण या सर्व इमारती बेकादेशीर आहेत.मग या लोकांचे काय? हा प्रश्न ग्रहण झाला होता, ठाण्यात खासकरून वागळे ,कळवा व मुंब्रा भागात अश्या इमारती व घरे मोठ्या प्रमाणात आहेत , मग यावरील एकमेव उपाय म्हणजे क्लस्टर योजना! आणि आता बेकायदा धोकादायक इमारतींत जीव मुठीत धरून राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने आणखी एक टप्पा गाठला असून, वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे क्लस्टरच्या प्रत्यक्ष अमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सत्ताधारी शिवसेनेकडून बोलले जात आहे.
क्लस्टर योजनेत सर्व सुविधा उपलब्ध करणार
ठाण्यातील बेकायदा धोकादायक इमारतींचा प्रश्न गेल्या दोन दशकांपासून चिघळला आहे. या हजारो इमारतींत राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना हक्काचे व सुरक्षित घर मिळावे, म्हणून वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली असून पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार आहे. सिडकोने या प्रकल्पासाठी वित्तीय सल्लागार म्हणून क्रिसिलची नियुक्ती केली असून आर्किटेक्चरल आणि मास्टर लेआऊट डिझाईन सल्लागाराची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ठाण्यातील एकूण १५०० हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना साकारत असून यात नागरिकांना स्वमालकीची, सुरक्षित घरे मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्याने, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार केंद्रे, अर्बन फॉरेस्ट आदी वैशिष्ट्ये असणार आहे.
निवडणुका आल्या की आठवण
क्लस्टर हा आमचा भावनिक विषय असून तो लवकरात लवकर व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, क्लस्टरची हि कार्यवाही पंचवार्षिक चालते आता महापालिका निवडणूक आहे, या आधी विधानसभेच्या निवडणुकीला अधिसुचना देण्यात आल्या होत्या, हि सर्व नागरिकांची दिशाभूल आहे. आता जर सामंजस्य करार झाला मग त्या वेळी नारळ कसले फोडले गेले. आणि त्या नंतर घटनात्मक अधिकारांचा वापर करून घेतला याची यादी देखील मी क्लस्टर साठी वारंवार पत्र व्यवहार केला आहे. क्लस्टर ची कायदेशीर कार्यवाही कशी पूर्ण झाली असा सवाल काँग्रेस चे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी केला आहे, क्लस्टर साठी या आधी रिहॅब इमारती तयार करून संक्रमण शिबीर चे आयोजन केले पाहिजे या साठी मोक्याच्या जागा बघून लोकांना सोयीस्कर होईल अशी व्यवस्था करून द्यावी व नागरिकांना खात्री करून द्यावी कि हे निवडणुकीचे गाजर नाही. तसेच क्लस्टर चा वापर निवडणुकीसाठी करू नये असे घाडीगावकर म्हणाले.
आता तरी कामाला सुरुवात करा नागरिक
आता प्रत्येक्षात क्लस्टर चे काम सुरु करावे .. प्रत्येक निवडणुकीला क्लस्टर होणार असे सांगितले जाते परंतु गेले १५ वर्षे आम्ही हेच ऐकत आहोत, निवडणूक झाल्या तर हा विषय निघूनच जातो परंतु आता कृपा करून राजकारण न करता ही योजना राबवावी ,आम्हाला कोणत्याही राजकारणाशी काही संबंध नाही आम्हाला फक्त घरे पाहिजेत अशी अपेक्षा या स्थानिक लोकांची आहे.