ठाणे - भिवंडीतून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. या घटनेला 5 महिने उलटून गेले, तरीदेखील या मुलीचा शोध लागत नसल्याने तिच्या कुटुंबाने चिंता व्यक्त केली आहे. मुलीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
बेपत्ता मुलीचे कुटुंब हे मुळ उत्तर प्रदेशमधील असून, उपजिवीकेसाठी ते भिवंडीत आले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात सर्वच कामे ठप्प असल्याने वडील गावी गेले होते. तर आई संगिता माळी या एका कपड्याच्या गोदामात मजुरीचे काम करत होत्या. १५ जून रोजी नेहमीप्रमाणे संगिता या कामासाठी बाहेर पडल्या. घरात त्यांची मुलगी आणि एक लहान मुलगा असे दोन जण होते. दुपारी घरी आल्यानंतर त्यांना आपली मुलगी घरात आढळून आली नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी कुठेच दिसत नसल्याने त्यांनी अखेर नारपोली पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मात्र या घटनेला 5 महिने उलटून गेले तरी देखील अद्याप या मुलीचा शोध लागलेला नाही.