ठाणे : 'स्टार कासव' ही भारतीय प्रजात असून ती वन्यजीव सुरक्षा कायद्यांतर्गत येते. या प्रजातीच्या कासवाला पाळणे आणि तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. आतापर्यंत स्टार प्रजातीची ७० कासवे वनविभागाच्या धडक कारवाईत हस्तगत करण्यात आली आहेत. या स्टार प्रजातीच्या कासवांची रवानगी प्रथमच कर्नाटकऐवजी ताडोबाच्या जंगलात केली जाणार आहे, अशी माहिती मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली. ठाण्यात वन्यप्राणी, पक्षी यांच्या तस्करीवरच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ठाणे हे तस्करांचा अड्डा झाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
७० कासवे केली होती जप्त -
आतापर्यंत वनविभागाने तब्बल ७० स्टार प्रजातीची कासवे हस्तगत केली आहेत. त्यांना टप्प्याटप्प्याने ताडोबाच्या जंगलात सोडण्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती शर्मा यांनी दिली. स्टार प्रजातीच्या कासवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी करण्यात येते. घरात हे कासव पाळणे शुभ मानले जाते. त्यामुळे हौसेपोटी अनेकजण अशा दुर्मिळ कासवांना घरात पाळतात.
कासवांना ताडोबा अभयारण्यात सोडणार -
यापूर्वी अशा प्रकारच्या कासवांना वातावरणाच्या अनुषंगाने कर्नाटकाच्या जंगलात सोडण्यात येत होते. पकडलेल्या कासवांना कर्नाटक राज्याच्या जंगलात सोडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, ताडोबाच्या जंगलातही स्टार प्रजातीचे कासव आढळल्याने आता वनविभागाच्या ताब्यात असलेले ७० स्टार कासव हे ताडोबाच्या जंगलात सोडली जाणार आहेत. आतापर्यंत वनविभागाने २१ कासव ताडोबाच्या जंगलात सोडले आहे. त्या कासवांची प्रकृती स्थिर राहिल्यास अन्य कासवांनाही तिथेच सोडले जाणार आहेत. राज्याबाहेर कासवांना सोडण्याऐवजी राज्यातच कासवांना ठेवण्याचा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे उप वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी सांगितले.
मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांची मदत -
वनविभागाने केलेल्या विविध कारवाईत स्टार प्रजातीचे कासव हस्तगत केले आहेत. त्यांना आता ताडोबाच्या जंगलात अनुकूल वातावरणात सोडण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कासव सोडण्यात आले आहेत. या कासवांनी ठाणे ते ताडोबा जंगल असा दोन दिवसांचा प्रवास केला आहे. या कासवांना एका कंटेनरमध्ये नेण्यात आले. दर तीन तासांनी कंटेनर थांबवून त्यांची तपासणी करावी लागत होती, अशी माहिती पवन शर्मा यांनी दिली.