ठाणे - कोविड १९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज पहाटे ४.३० वाजता जिल्ह्यात दाखल झाला. १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. विशेष वाहनाने ही लस ठाणे येथे आणण्यात आली असून, उपसंचालक कार्यालय, मुंबई मंडळ, ठाणे येथे हा साठा पोहोचविण्यात आला आहे.
हेही वाचा - ठाण्यात प्रथमच प्रसाधनगृहात महिलांसाठी सुसज्ज मासिक पाळीची खोली
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे हे लसीकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत.
लसीची प्रतीक्षा संपुष्टात
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यासाठी १ लाख ३ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे, या तिन्ही जिल्ह्यातील नागरिकांची लसीची प्रतीक्षा संपुष्टात आली असून दिलासा मिळाला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यासाठी सर्वाधिक ७४ हजार लसी प्राप्त झाल्या असून, जिल्ह्यातील २९ केंद्रांवर त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तर, पालघर जिल्ह्यासाठी १९ हजार ५०० लसी सहा केंद्रांवर तर, रायगड जिल्ह्यासाठी ९ हजार ५०० लसींचे ५ केंद्रांवर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
हेही वाचा - गोडवा महंगाई मार गयी, साखर स्थिर गूळ-तिळाचे भाव वाढले