मीरा भाईंदर (ठाणे) - कर्जबाजारी झाल्याने सामायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी (दि. 30 मे) दुपारी मिरारोडच्या सीजन हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमध्ये सात वर्षाच्या लहान मुलीचा मृत्यू झाला असून पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून पती मात्र शुद्धीत येताच फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 27 मे रोजी रायन ब्रोको हे आपल्या पत्नीसह मुलीला घेऊन काशीमीरा परिसरातील सीजन हॉटेलमध्ये आले होते. रविवारी (दि. 29 मे) रात्री पती-पत्नीने उंदीर मारण्याचा विषारी द्रव्य प्राशन केले तर मुलगी अनायक हिला विषारी गोळ्या दिल्या.
सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास पत्नी पूनमला जाग आली तेव्हा मुलगी मृतावस्थेत आढळली तिचा पती घरामध्ये नव्हता त्यावेळी पूनम यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना संपर्क करून याबाबत काशिमिरा पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पूनमला रुग्णालयात दाखल केले. दोघे कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे सामायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती समोर आली आहे. पुढील तपास काशीमीरा पोलीस करत आहेत.
हेही वाचा - MNS agitation : ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांचे नाल्यात उतरून केले क्रिकेट खेलो आंदोलन....