ठाणे : भातसा धरणापासून ३१ किमी अंतरावर वासिंद गावाजवळ उजव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मात्र २४ तासाचा कालावधी होत आला असून भातसा प्रशासनाकडून सध्याही घटनास्थळी दुरुस्तीचे काम सुरु असल्याने कालव्याचे पाणी भातसा प्रशासनाने बंद केले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच कालव्याचे पाणी काही दिवस बंद करण्यात आले होते. त्यामुळे शेतातील पिकांसह भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्याचे नुकसान झाले होते.
भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया : भातसा कालव्याला शहापूर तालुक्यातील वासिंद गावा नजीक उजव्या कालव्याला मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास भगदाड पडून लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे भलेमोठे भगदाड पडल्याने कालव्याचे पाणी बंद करण्यात आले असून आता पाण्याअभावी उन्हाच्या तडाख्यात पिके करपून नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. किमान ४० वर्षे जुना झालेल्या भातसा उजवा कालव्यातून पाण्याची प्रचंड प्रमाणात गळती होत आहे. उंदीर, घुशी आणि खेकड्यानी पोखरून ठेवलेल्या भातसा उजव्या कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. कालव्याची साफसफाई, दुरुस्तीची कामे वेळोवेळी होत नसल्याने वाताहत झालेल्या कालव्याला कुठे न कुठे भगदाड पडून लाखो लिटर पाण्यासह शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होत आहे.
भाजीपाल्याचे पाण्याअभावी नुकसान : सातशे क्युसेक्स क्षमता असलेल्या उजव्या कालव्यातून अवघे २५० क्युसेक्स क्षमतेने पाणी सोडण्यात आले होते. रब्बी हंगामासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आल्याने कालवाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावातील शेतकर्यांच्या शेतीचे, भाजीपाल्याचे पाण्याअभावी नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. भातसा धरण विभागातील अधिकाऱ्यांनी कालच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर भगदाड पडलेल्या ठिकाणी काल (मंगळवारी ) सायंकाळी तात्पुरत्या स्वरूपाची मातीच्या भरावाचे काम तातडीने करण्यात आले होते. कालव्याला भगदाड पडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा कालवा आता हानिकारक ठरू लागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
या संर्दभात भातसा प्रकल्पाचे जलसंपदा विभागाचे अभियंता नामदेव खाटमोडे यांच्याशी संपर्क साधला असता, 18 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता भातसाचा उजवा कालवा फूटल्याची घटना घडली होती. पाणी पूर्णपणे बंद केलेला आहे. तर आज दुपारनंतर जलसंपदा विभागाची यांत्रिकी मशीनचा वापर करून पाणी बंद करण्यात येणार आहे. कालच तात्पुरते भरावाचे काम करून पाणी थांबवण्यात यश आले. मात्र कायमस्वरूपी फुटलेला कालवा बंद करण्यासाठी जलसंपदा विभागाची यांत्रिकी मशीनचा वापर करून पाणी बंद करण्यात येणार असल्याचीही माहिती अभियंता नामदेव खाटमोडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Mumbai Crime : आकर्षक व्याजाचे गाजर; आर्किटेक व्यावसायिकाची ५० लाखांची फसवणुक