नवी मुंबई - सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही कोरोना रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता पालिका प्रशासनाकडून सर्व प्रयत्न सुरू आहेत. असे असतानचा पालिकेतील कोरोना टेस्ट करणाऱ्या लॅब बंद असल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तो व्हिडिओ खोटा असल्याचा दावा नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केला आहे. महापालिकेने कोव्हिड संबधीत तपासणी करण्या करीता सुरू केलेल्या लॅब कधीही बंद नव्हत्या असे आयुक्तांनी सांगितले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आरटीपीसीआर लॅब आठ दिवसांपासून बंद असल्याचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरविण्यात आला. मात्र एकही दिवस लॅब बंद नसल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील टेस्टिंगची क्षमता अधिक असल्याने मुंबई वगळता इतर जवळपासच्या महापालिका क्षेत्रातील टेस्टिंग नवी मुंबईत करण्यास सुरुवात केली असल्याचे देखील आयुक्त बांगर यांनी सांगितले.
महापालिकेच्या आरटीपीसीआर लॅब मध्ये तपासणी करता आवश्यक इतके मनुष्यबळ आहे. तसेच नवी मुंबई महापालिकेची 3 शिफ्ट मध्ये 24 तास लॅब सुरू असते, आर टी पी सी आर व अँटीजन यांचा समतोल साधून टेस्ट केल्या जात आहेत. सद्यस्थितीत दररोज अडीच ते तीन हजार टेस्ट केल्या जात आहेत. लोकसंख्येच्या एमएमआर रिजन मधील सर्वात जास्त कोरोना टेस्ट नवी मुंबईत होत असल्याचेही आयुक्त बांगर यांनी यावेळी माहिती देताना सांगितले