ठाणे : आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घंटागाड्यांमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात केली असून, तशी सवय नागरिकांना लागली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर येथील नागरिक रात्री कचरा टाकण्यासाठी आता घंटागाडयांची वाट पाहत असताना दिसत आहेत. त्यामुळे 'बदलत्या ठाण्याबरोबर लोकांची बदलती मानसिकता' यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. ठाणे शहराचा विकास हा झपाट्याने होत असून या शहरातील बदल हे नागरिकांना दिसायला सुरूवात झाली आहे. आता ठाणे बदलत असून येत्या सहा महिन्यात ठाणे शहर स्वच्छ, सुंदर, कचरामुक्त आणि सौंदर्यीकरणाने नटलेले दिसणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी व्यक्त केला होता. त्याचीच प्रचिती आता समोर दिसून येत असून ठाणेकर नागरिकांची मानसिकता देखील बदलत आहे.
सहा महिन्याचे अभियान राबविण्यात येणार : आपले ठाणे, सर्वांचे ठाणे असे समजून नागरिकांनी या अभियानाला सहकार्य मिळत असून नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे अभियान पूर्ण होणार नाही. त्यामुळे ठाणेकर नागरिकांनी योगदान द्यावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या अभियानानात स्वच्छ व सुंदर ठाणे, खड्डेमुक्त ठाणे व स्वच्छ शौचालय यांचा समावेश आहे. स्वच्छ व सुंदर ठाणे अंतर्गत शहरातील सर्व रस्ते, सार्वजनिक जागा, पर्यटन स्थळे कायमस्वरुपी स्वच्छ ठेवणे, नेहमी कचरा पडणाऱ्या शहरातील सर्व जागा कचरामुक्त करुन त्या सर्व ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, डेब्रिजमुक्त ठाणे शहर, शहरातील रस्ते, उड्डाणपूल यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे, शहराच्या स्वच्छतेत महत्वाचे योगदान देणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणे व सफाई कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांची महापालिका रुग्णालयात मोफत आरोग्य तपासणी करणे असे सहा महिन्याचे अभियान राबविण्यात येणार आहे.
हा अभिनव भविष्यात लाखमोलाचा ठरणार : स्वच्छ व आरोग्यदायी ठाणे शहर निर्माण होणार आहे. ठाणे शहर सौंदर्यीकरणा अंतर्गत शहरातील प्रवेशद्वार,शिल्पाकृती सह चौक सुशोभिकरण, रस्ते सुशोभिकरण, भित्तीचित्रे, डिव्हायडर व कर्ब स्टोनची रंगरंगोटी, थर्मोप्लस्टिक पेंटद्वारे लेन मार्किंग व झेब्रा क्रॉसिंग, उड्डाणपुल, पादचारी पूल, खाडीवरील पूल, शासकीय इमारतींची रंगरंगोटी व विद्युत रोषणाई, मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करुन वृक्ष लागवड करुन स्वच्छतेसोबत सौंदर्यात भर पडणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे बदलत्या ठाणे बरोबरच ठाणेकरांची मानसिकता बदलत असल्याने स्वछ ठाणे, सुंदर ठाणे, कचरामुक्त ठाणे हा अभिनव भविष्यात लाखमोलाचा ठरणार आहे.
नवी मुंबई या स्वच्छ शहरामधला प्रयोग ठाण्यातही राबवणार : ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेची धुरा खातात असताना या शहरांमध्ये अमुलाग्र बदल करत या शहराला देशात आणि महाराष्ट्रात स्वच्छ शहराचा मान मिळवून दिला. आता हीच संकल्पना ठाण्यात देखील राबवली जाणार असून ठाणे शहरातल्या सार्वजनिक वास्तू सुशोभित करून ठाणे शहराला देखील स्वच्छ शहराचा मान देण्याचा प्रयत्न आयुक्त आणि प्रशासनाकडून केला जात आहे.