ठाणे - ठाण्यातील जलवाहतूक प्रकल्प पुढील पावसाळ्याअगोदर सुरू होणार आहे. केंद्रीय जल बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी महाराष्ट्रातील अंतर्गत जलवाहतूक विकासकामांच्या प्रगतीबाबत ऑनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पुढील पावसाळ्यापूर्वी म्हणजे जून 2021 पूर्वी सर्व सुविधांसह फेरीबोट सुरू होईल असं आश्वासन राजन विचारे यांना दिले आहे.
प्रवासाचा ताण पाहता जलवाहतूक एक प्रभावी पर्याय म्हणून आणि महापालिकेस ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा उपलब्ध असल्याने त्याच्या अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर करता येईल, असा अहवाल ठाणे महानगरपालिकेने २०१६ साली केंद्राकडे सादर केला होता. यामध्ये वसई -ठाणे – कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये १० ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात ठाणे-मुंबई, ठाणे-नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गाचे देखील नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे-मुंबई १० ठिकाणी, ठाणे-नवी मुंबई ८ ठिकाणी जेट्टींचा समावेश आहे.
पहिला टप्पा - वसई - ठाणे – कल्याण (५० किमी) जलमार्ग क्र. ५३ या मार्गावर पुढीलप्रमाणे १० जेटी असणार आहेत.
1. वसई
2. मीरा भाईंदर
3. घोडबंदर
4. नागला बंदर
5. कोलशेत
6. काल्हेर
7. पारसिक बंदर
8. नाजूर दिवा
9. डोंबिवली
10. कल्याण
दुसरा टप्पा - ठाणे ते मुंबई व नवीमुंबई (९३ किमी) या मार्गावर पुढीलप्रमाणे १८ जेटी असणार आहेत.
1. साकेत
2. कळवा
3. विटावा
4. मीठ बंदर
5. ऐरोली
6. वाशी
7. ट्रोम्बे
8. एलिफंटा
9. फेरीघाट
10. गेटवे ऑफ इंडिया
11. वाशी
12. नेरूळ
13. बेलापूर
14. तळोजा
15. जुईगाव
16. पनवेल
17. जे. एन. पी. टी.
18. मोरा
अशाप्रकारे जेटी असणार असून या जलवाहतुकीमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.