ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील राजनोली नाका येथील स्विटहार्ट या आर्केस्ट्रा बार चालकावर 28 मेच्या पहाटे अडीच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केल्याची घटना घडली होती. अमोल बोराडे, असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या आर्केस्ट्रा बार चालकाचे नाव आहे. गोळीबार करणाऱ्या दुकलीला कोनगाव पोलिसांनी सापळा रचून इंदौर शहरातून गजाआड केले आहे.
आरोपी कपिल कथोरे व इरफान खान हे स्विटहार्ट बारमध्ये 26 मे रोजी दारु पिण्यासाठी आले असता त्यांचे बारचालक अमोल बोराडे यांच्यासोबत वाद होऊन भांडण झाले होते. त्यावरून हल्ला झाल्याची माहिती आहे.
या गोष्टीचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांचे २ स्वतंत्र पथक इंदौर मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश येथे तपासाकामी रवाना झाले होते. पोलिसांनी सापळा रचून आरोपी कपिल कथोरे व इरफान कय्युम खान यांच्या मुसक्या आवळल्या. तर हल्ला करण्यासाठी वापरलेली गावठी पिस्टल जप्त करून या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना भिवंडी न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली सुनावली आहे.
दरम्यान आरोपीचे व बार चालकाचे दारुच्या बिलावरून वाद झाल्याने गोळीबार केल्याची माहिती पोलीस देत आहे. मात्र, सखोल तपास केला असता या हल्ल्या मागील दुसरे कारण पुढे येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांनी वर्तविली आहे. यामुळे गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.