ठाणे- कापूरबावडी पोलिसांनी एका अट्टल चोराला ताब्यात घेतले आहे. अनेक महिन्यांपासून कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी, मोबाईल आणि पार्किंग केलेल्या बाईक चोरीच्या घटनात वाढ झाली होती. त्यामुळे कापूरबावडी पोलिसांनी पाळत ठेवून अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
जवळपास पंधरा लाख रुपये किमतीचा एक हायवा टिप्पर चोरी गेल्याने पोलीस सतर्क झाले. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या अदेशानुसार कापूरबावडी पोलिसांनी कसून तपास केला. त्यानंतर कळवा शांतीनगर येथे राहणारा पण मूळचा बिहार येथील मोनू सबदर खान व महेश बाळासाहेब भिसे या अट्टल चोरांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, महागडे मोबाईल, बाईक आणि टिपर असा एकूण 19 लाख 90 हजारांचा माल हस्तगत केला. यासोबतच दोन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि काही गोळ्या देखील मोनू खाना यांच्याकडून पोलिसानी जप्त केल्या. मोनू हा अट्टल सोनसाखळी चोर असून चोरी दरम्यान विरोध झाल्यास थेट गोळीबार करत असे अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली.