ठाणे - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या उद्देशाने पोलिसांचे चांगले नियोजन पाहायला मिळत आहे. गावठी कट्टा व बंदूक बाळगणाऱ्या आरोपीला शांतीनगर पोलिसांनी पाईपलाईन रोडवर सापळा लावून अटक केली.
हेही वाचा - पुण्यात पोलिसांनी जप्त केले 371 बेकायदेशीर कोयते
शब्बीर बहादूर शेख उर्फ उस्ताद (वय-३८ राहणार नवीवस्ती ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शब्बीर हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्टा व बंदूक घेऊन ती इतर कोणाला तरी देण्यासाठी पाईपलाईन रोडवर येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक ममता डिसोझा यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. चाळके यांच्या नेतृत्वाखाली पथकाची निवड करून कारवाईचे निर्देश दिले होते.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास शांतीनगर येथील पाईपलाईन रोड येथे सापळा लावला. त्यावेळी आरोपी येताच त्याला हत्यारांसह ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे २० हजार ४०० रुपये किंमतीचा गावठी कट्टा व छऱ्यांची बंदूक तसेच २ जिवंत काडतुसे आढळून आली. हे सर्व जप्त करून पोलिसांनी शब्बीरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला बुधवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चाळके करत आहेत.
हेही वाचा - सांगलीमध्ये सोन्याच्या दुकानातुन तब्बल दोन किलो सोने कारागिराने पळवले