ठाणे - खाडी संवर्धनात आपला खारीचा वाटा असावा या उद्देशाने गणेशोत्सवाच्या काळात बहूतांशी ठाणेकरांनी खबरदारी घेतली आहे. दरवर्षी विसर्जन सोहळ्यानंतर ठाणे खाडीत मोठ्या प्रमाणात निर्माल्याचे तरंगलेले दिसते. कोपरी विसर्जन घाटावर उभे राहल्यानंतर तर साधारण एक ते दिड किलोमीटर लांब पट्यात निर्माल्य तरंगताना दिसते. मात्र, यावर्षी तसे चित्र दिसले नाही.
नदी, खाडी किंवा समुद्रच्या पाण्यातच निर्माल्याचे विसर्जन करण्याचा अनेकांचा मानस असतो. गणेशोत्सवाच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पूजेचे साहित्य पाण्यात सोडले जाते. निर्माल्य पाण्यात विसर्जन केल्यावर यातील फुल, पान, दुर्वा आदी माश्यांसाठी खाद्य बनू शकते असा समज अनेकांचा आहे. मात्र, निर्माल्य हे जलचरांसाठी घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. निर्माल्यामुळे ऑक्सिजनची मात्रा कमी होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढतो.
खाडीत अगोदच मोठ्या प्रमाणात प्रदुषण आहे. निर्माल्यामुळे यात आणखी भर पडू शकते. पाण्यातील निर्माल्य सडून जलचरांसाठी मृत्यूला निमंत्रण देणारे ठरत असल्याचे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ . प्रमोद साळसकर यांनी व्यक्त केले आहे. भाविकांनी खाडी संवर्धनासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.
निर्माल्याचे खत करण्याकडे ठाणेकरांचा कल
खाडीतील निर्माल्य माश्यांसाठी अपायकार आहे. त्यामुळे निर्माल्य पाण्यात सोडण्याऐवजी त्याची खत निर्मिती करण्याच्या संकल्पनेचे भाविकांनी स्वागत केले आहे. निर्माल्य ठाणे खाडीत टाकणार नाही, असा संकल्प करुन अनेक भाविकांनी विसर्जनावेळी आणलेले निर्माल्य स्वखुशीने खत निर्मितीसाठी दिले आहे.
जलचरांच्या पोटात रासायनिक घटक
ठाणे, नवी मुंबई शहरातील कारखान्यातील रसायने, सांडपाणी, रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्यामुळे खाडी प्रदुषणाच्या खाईत गेली आहे. खाडीतील प्राणवायू कमी झाल्याने अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या काळात निर्माल्य पाण्यात सोडल्यामुळे या जलप्रदुषणात आणखी वाढ होण्याची शक्यता असते. ठाणे खाडीत प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. पाण्यात असलेले मर्क्यूरी, शिसे यांसारखे जड धातू जलचरांसाठी घातक ठरत आहेत. ठाणे खाडीतील जलचरांच्या शरिरात अंशरुपाने हे धातू आढळून आले आहेत. खाडीतील खेकडे,मासे,कोळंबी खाल्ल्याने याचा परीणाम मानवी शरीरावरदेखील होत आहे.