ठाणे - राज्यात कोरोनाने धुमाकुळ घातला असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शक्य ते प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे चित्र ठाण्यातील जांभळीनाका भाजी मार्केटमध्ये दिसून आले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी आणि सहाय्यक आयुक्त प्रणाली घुगे यांनी अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यात ही बाब समोर आली.
ठाण्यात दररोज शेकडो नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आवश्यक त्या उपाययोजना करुनही रुग्णसंख्या कमी होत नाही. याचे कारण शोधण्यासाठी उपायुक्त माळवी आणि सहाय्यक आयुक्त घुगे यांनी पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे वास्तव समोर आले. प्रत्येक दुकानामध्ये नागरिकांची गर्दी बघायला मिळाली. नागरिक मास्क न वापरता आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे उपायुक्तांनी अनेक दुकानांवर कारवाई केली तर काही दुकानांतील माल जप्त केला.
नागरिकांच्या सोयीसाठी शासनाने लॉकडाऊनमध्ये सवलती दिल्या. नागरिक मात्र, एकदम कोरोना पूर्णपणे संपल्यासारखे फिरत आहेत. नियमांचे पालन न करता विनाकारण रस्त्यांवर गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाला आळा बसत नसल्याचे चित्र आहे.