ठाणे: लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग पूर्णत: बंद करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. वारंवार विनंती करुन देखील या भागातील नागरीक लॉकडाऊनचे उल्लंघन करत असून ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक 13 (संभाजीनगर, लेनिननगर, जीजामातानगर, रामचंद्रनगर 1.2 व 3. ज्ञानेश्वरनगर, काजुवाडी, लुईसवाडी, हाजुरी), प्रभाग क्रमांक 14 (सावरकरनगर, लोकमान्यनगर, बस डेपो, डवलेनगर, यशोधननगर, रखेची माता चौक, महात्मा फुलेनगर, लोकमान्यनगर पाडा, वेदांत कॉम्प्लेक्स रोड, विजयनगर), प्रभाग क्रमांक 15 (इंदिरानगर, रुपादेवी पाडा, साठेनगर, हनुमाननगर, आंबेवाडी, जय भवानीनगर) मध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती मार्फत विभाग पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यानुसार, मासळी, मटन आणि चिकन विक्री करणारी तोल दुकाने, अन्न धान्याची दुकाने, बेकरी ही अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला आणि फळांची दुकाने २७ एप्रिलपासून ते ३ मे रात्री १२ पर्यंत बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. या अशा वस्तूंची होम डिलेव्हरी करण्यास मुभा देण्यात आली आहे. ही मुभा फक्त ठाणे महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या व्यावसायिकांनाच असेल. फक्त मेडीकल आणि दुध डेअरी पालिकेने दिलेल्या ठराविक वेळेतच सुरू राहतील.