ठाणे - मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली ( MNS Vandalism IPL Bus ) होती. ही घटना ताजी असतानाच आज ( गुरुवार ) एक ठिगणी ठाण्यात पडली आहे. आयपीएलसाठी ठाणे महापालिकेने झाडांच्या फांद्या तोडल्या ( Thane Municipal Corporation Cut Down Trees ) आहेत. याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. पुन्हा अशा फांद्या तोडल्यास उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेने दिला ( MNS Warn Of Agitation ) आहे.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सरावासाठी येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून रंगरंगोटी करण्यात येत आहे. त्यासोबत काही झाडांच्या फांद्या देखील तोडल्या आहेत. यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका सुरु आहे. ठाण्यातील पारा 43 डिग्रीच्या वर गेल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच या प्रकारची वृक्षतोड करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. मनसे याचा विरोध करुन आयपीएला धडा शिकवेल, असा इशारा वाहतूक सेनेचे अध्यक्ष आशिष डोके यांनी दिला.
पुन्हा झाडे तोडल्याल उग्र आंदोलन
पुन्हा अशा फांद्या तोडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल. आयपीएल दरम्यान परराज्यातील बसेस ठाण्यात आल्या तर त्याविरोधात देखील मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड दमही आशिष डोके यांनी दिला आहे.
मंगळवारी मनसेने फोडली बस
मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली होती. आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री फोडली.
हेही वाचा - Nitin Gadkari Reaction : गोव्यानंतर आता 'मिशन महाराष्ट्र 2024', राज्यात भगवा फडकणार - नितीन गडकरी