ठाणे - महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणानंतर बदली करण्याच्या विनंती अर्जासह दीर्घ रजेवर जाण्याची परवानगी जयस्वाल यांनी मुख्य सचिवांकडे मागितली.
संजीव जयस्वाल हे मागील पाच वर्षांपासून ठाणे महानगरपालिकेत आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वादग्रस्त कार्यशैलीमुळे सत्ताधारी, विरोधकांसह अनेकांसोबतचे वाद ठाण्यात पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाठवलेल्या मेसेजनंतर आयुक्त आणि अधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
हेही वाचा - शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींचा लैगिंक छळ, तक्रारपेटीद्वारे प्रकार उघड
या वादाबाबत शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली होती. 'आयुक्तांनी बदलीबाबत अर्ज केला असून दीर्घ सुट्टीची मागणी केली आहे. यादरम्यान त्यांनी कामाचा भार कुठल्याही अधिकाऱयावर सोपवला नाही' अशी माहिती यावेळी सभागृहात पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे महापालिका आयुक्तपदाच्या नियुक्तीपासूनच त्यांच्यावर रोष होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतला. त्यांच्या वादग्रस्त वागण्यामुळे ठाण्यात अनेकदा वाद निर्माण झाला होता. कोणत्याही आयएएस अधिकाऱ्याची एवढी मोठी कारकीर्द ठाण्याला कधीही पाहायला मिळाली नव्हती. एकूणच महाराष्ट्रातदेखील एकाच ठिकाणी कार्यरत राहण्याचा पाच वर्षांचा विक्रम संजीव जयस्वाल यांनी मोडून काढला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तीय आहेत.