नवी मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शुक्रवारी अखेर जामीन मंजूर झाला आहे. कोव्हिड रुग्णालयात कार्यरत नर्सेसच्या प्रश्नावर आंदोलन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जे घाबरलेत त्यांना मी आणखीन घाबरवणार, असे वक्तव्य जामीन मिळाल्यानंतर अविनाश जाधव यांनी केले. या सुटकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे मनपाने काही नर्सेस नियुक्त केल्या होत्या. त्यानंतर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याविरोधात जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी ठाणे महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना अटक झाली होती.
अटकेनंतर जाधव यांनी ठाणे दिवाणी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पोलिसांनी अधिक वेळ मागितल्यानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. शुक्रवारी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जाधव यांना जामीन मंजूर करण्यात आला.