ठाणे - प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. भिवंडी शहरातील भाग्यनगर येथे ही घटना घडली. स्वाती प्रल्हाद वेमुला (वय-२१ रा. भाग्यनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
मृत स्वातीचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेले होते. ती ठाणे येथील आयडीएफसी बँकेत मागील सहा महिन्यांपासून नोकरी करत होती. तिच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने ती मोठ्या बहिणीच्या घरी राहत होती. तिचे पद्मानगर येथील पॅथालॉजी लॅबमध्ये काम करणाऱ्या साई नावाच्या तरुणासोबत मागील चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्याने स्वातीला लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, आठ दिवसांपूर्वी स्वातीने प्रियकराला लग्नाबाबत विचारले, असता त्याने लग्नाला नकार दिला.
हेही वाचा - घाटकोपरमधील 'श्रीजी' टॉवरला आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल
त्यामुळे स्वाती अस्वस्थ होती. प्रियकराने केलेला विश्वासघात असह्य झाल्याने घरी एकटी असताना तिने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. भिवंडी शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद केली आहे. याबाबत अधिक तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.