ठाणे - शहापूर तालुक्यातील खर्डी वन परिक्षेत्रातील जंगलात सापळे लावून शिकारीच्या तयारीत असलेल्या शिकाऱ्यांची टोळी वन कर्मचाऱ्यांच्या जाळ्यात अडकली आहे. या टोळीतील 8 शिकऱ्यांवर वन्यजीव कायद्याअंतर्गत खर्डी वन अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत जंगलात वन अधिकारी प्रशांत देशमुख हे पथकासह गस्त घालत होते. त्यावेळी या पथकाला जंगलातील एका भागात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या वाघूर ( सापळे) लावल्याचे निदर्शनास आले. यावेळी काही शिकारी जाळे लावून शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसतास वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, शिकारीच्या उद्देशाने वाघूर (सापळे) लावण्यात आल्याचे कळताच या 8 आरोपींवर भारतीय वन्यजीव अधिनियम कायद्या नुसार 1972 चे कलम 9 व 52 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आहे. त्यांच्याकडून 8 वाघूर ( ससे व काळवीट पकडण्याचे सापळे) जप्त करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली आहे.