ठाणे - २०१४ च्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत जिल्ह्यात २.०७ टक्क्यांनी मतदान घटले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ४ लाख १ हजार ६२३ मतदार वाढले असले तरी मतदानाच्या संख्येत ५२ हजार ७०९ मतांनी घट झाली आहे. भिवंडी पश्चिम , भिवंडी पूर्व , अंबरनाथ , उल्हासनगर, या मतदारसंघात मात्र मतदान वाढले असून इतर ठिकाणी मतदान घटले आहे. वाढलेल्या आणि घटलेल्या मतांचा फायदा कोणाला आणि फटाका कोणाला बसणार हे निकालादिवशी स्पष्ट होईल.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत ६.६४ टक्के मतदान कमी झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे, राष्ट्रवादीच्या मधुरा म्हात्रे आणि मनसेच्या शुभांगी गोवारी यांच्यात तिरंगी सामना आहे. भिवंडी पूर्वेत ३.५१ टक्के मतं वाढली असून शिवसेनेचे रूपेश म्हात्रे आणि काँग्रेसचे संतोष शेट्टी यांच्यात थेट लढत आहे. मुरबाड मतदारसंघात ४. ८१ टक्के मतदान कमी आहे.भाजपचे किसन कथोरे,राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांच्यात सामना होत आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात १.५७ टक्के मतदान कमी झाले असून शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने मनसेचे प्रमोद उर्फ राजू पाटील याना पाठिंबा दिला असल्याने या ठिकाणची लढत रंगतदार होणार आहे.
मिरा भाईंदर मतदारंघात ४.२५ टक्के मतदान कमी झाले आहे. भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे माजी आमदार मुझफर हुसेन यांच्यात लढत असली तरी भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनी बंडखोरी केल्याने चुरस वाढली आहे.ठाण्याच्या ओवळा माजिवडा ७.३४ टक्के मतदान कमी झाले आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात मुख्य लढत असून मनसेचे संदीप पाचंगे हेही मैदानात आहेत.
मुंब्रा-कळवा मतदारसंघात २.४८ मतं वाढली असून या मतदारसंघात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी चित्रपट अभिनेत्री दीपाली सय्यद यांना शिवसेनेने मैदानात उतरवले असल्याने रंगत वाढली आहे. नवी मुंबईच्या ऐरोली मतदारसंघात ८.९६ टक्के मत कमी झाली आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले माजी मंत्री गणेश नाईक मैदानात उतरले आहेत. बेलापूर मतदारसंघात ४.५३ टक्के मतं कमी झाली आहेत. भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना राष्ट्रवादीचे अशोक गावडे, मनसेचे गजानन काळे आणि शिवसेना बंडखोर विजय माने यांनी आव्हान दिले आहे.
भिवंडी - उल्हासनगर पट्ट्यात मतदान वाढले.
जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात मतदान कमी झाले असताना भिवंडी पूर्व मतदारसंघात ३.५१ टक्के, भिवंडी पश्चिम मतदारसंघात १. ६४ टक्के, अंबरनाथ मतदारसंघात २.६१ टक्के आणि उल्हासनगर मतदारसंघात सर्वाधिक ८.६७ टक्के मतदान वाढले आहे.