ठाणे : Thane Crime : शिवसेना माजी नगरसेवकाच्या भावाचा आणि त्यांच्या पत्नीचा राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Thane Murder) आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना ठाण्यात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप साळवी असं पतीचं नाव असून ते ठाणे महापालिकेचे माजी महापौर गणेश साळवी यांचे भाऊ आहेत. या घटनेनं ठाण्यात मोठी दहशत निर्माण झाली आहे. घटनास्थळावर पोलिसांना गोळी झाडल्याचे पुरावे आढळून आल्यानं या खुनामागचे गूढ वाढलं आहे.
गोळीबाराच्या घटनेनं कळवा हादरलं : ठाणे महापालिकेचे माजी माजी महापौर गणेश साळवी यांचे भाऊ दिलीप साळवी त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी रात्री त्यांच्या घरात बसले होते. मात्र, त्याचवेळी गोळी झाडल्याचा आवाज आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यामुळे लगेच नातेवाईकांनी दिलीप साळवी यांच्या घराकडं धाव घेतली असता, त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. कळवा परिसरातील राहत्या घरी हा संपूर्ण प्रकार घडला. गोळीबाराच्या घटनेनं कळवा हादरलं असून स्थानिक पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दिलीप साळवी यांना एक मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे. मात्र, दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह घरात आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
खुनाच्या कारणांचा पोलीस घेत आहेत शोध : या घटनेत गोळीबार का करण्यात आला, याबद्दल नातेवाईकांकडं विचारपूस केली जात आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याच्या अहवाल आल्यानंतरच कारण समोर येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे. दिलीप साळवी यांनी एक गोळी झाडली असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालातच सविस्तर माहिती समोर येणार आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत अहवाल येण्याची पोलिसांना अपेक्षा आहे. या घटनेबाबत कळवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून फॉरेन्सिकचं पथक पुरावे गोळा करत असल्याची माहितीही पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी दिली आहे.
हेही वाचा :