ठाणे Thane Crime News : ठाण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नौपाडा भागात ब्युटी पार्लर आणि स्पाच्या नावाखाली सर्रास होत असलेल्या वेश्या व्यवसायाविरोधात नौपाडा पोलिसांनी कारवाई केलीय. या कारवाईत ब्युटी पार्लरच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं असून दोन पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आलीय.
कसा रचला सापळा : नौपाडा भागात एका ब्युटी पार्लरच्या नावाखाली अवैध वेश्या व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलिसांनी एका डमी ग्राहकाला तिथं पाठवलं. या ग्राहकानं आत जाऊन तेथील मॅनेजरकडं मुलींची मागणी केली. त्याला तिथं बसवून स्पा मॅनेजरनं त्याच्यासमोर दोन मुलींना उपस्थित केलं आणि त्यातील एका मुलीला निवडण्यास सांगितलं. यावरुन तिथं वेश्या व्यवसाय सुरु असल्याची पोलिसांना खात्री पटली. यानंतर पोलिसांनी तातडीनं ब्युटी पार्लरवर धाड टाकून तेथील महिला मॅनेजरला ताब्यात घेत याठिकाणाहून दोन पीडित महिलांची सुटका केली.
भाजपा आमदारांच्या कार्यालयाच्या शेजारी सुरु होता व्यवसाय : ठाणे शहराचे भाजपा आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या स्पामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनधिकृत व्यवसाय सुरु होता. याबाबत आमदार केळकर यांना विचारलं असता, त्यांनी ठाणे हे सांस्कृतिक शहर असून आपण नेहमीच अनधिकृत मसाज पार्लर, स्पा, हुक्का पार्लर व इतर धंद्याबद्दल आवाज उठवल्याचं सांगितलं. अशा प्रकारचा कोणताही अनधिकृत व्यवसाय सुरु असेल, तर पोलिसांनी त्या विरोधात तातडीनं कठोर पावलं उचलून निर्बंध करावेत, असं आवाहनही त्यांनी पोलिसांना केलंय.
हेही वाचा :