ठाणे - व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना नौपाडा पोलीसांनी अटक केली. पोलीस असण्याचा बनाव करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्याचा डाव नोकराच्या सतर्कतेमुळे टळला. पोलीसांनी आरोपींकडून एक लायटर असलेले बनावट पिस्तूल, दोन बेड्या आणि पोलीसांचा गणवेश जप्त केला आहे. याप्रकरणी, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परेश पाटील, अभिजीत उतेकर, धनाजी दळवी आणि समीर वाडवेली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या टोळीतील परेश याने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील एका खाद्यपदार्थाच्या दुकानातून मोमोज खरेदी केले. काही वेळाने, या मोमोजमध्ये स्टेपलरची पिन सापडल्याची तक्रार करत, एका साथीदाराला पोलीसाच्या गणवेशात सोबत घेऊन परेशसह आणखी तीन साथीदार आले. या चौकडीने एका नोकराला बेड्या घालून, गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यासोबतच, गुन्हा दाखल करू नये यासाठी व्यापाऱ्याकडे 20 हजार रूपयांची खंडणी मागितली.
मात्र, दुकानातील एका नोकराला या पोलीसावर संशय आला. त्याने नौपाडा पोलीस ठाण्यातील आपल्याशी परिचित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर, नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, सापळा रचून या चौघांच्याही मुसक्या आवळल्या.