ठाणे Thane Crime News : नोकरी गेल्याने नवरा बेरोजगार झाला. त्यामुळे बायको सारखी नोकरीसाठी तगादा लावून नवऱ्याला घरगडी सारखं राबवत असल्याच्या संशयातून २३ वर्षांच्या नवऱ्याने १९ वर्षांच्या बायकोला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्तावर असलेल्या एका सोसायटीत घडली आहे. पीडित बायकोच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवऱ्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला आहे. तर पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहे. खुशाल बाजीराव जाधव असे फरार नवऱ्याचे नाव आहे.
नवऱ्याला सांगितलं काम : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरा खुशाल हा कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्तावर असलेल्या स्काय ॲम्बीयन्स सोसायटीत बायको सोबत राहतो. काही महिन्यापूर्वी आरोपी खुशालची नोकरी गेल्याने तो बेरोजगार झाला होता. मात्र त्याची बायको नोकरी करत असतानां तिचीही नोकरी गेली आहे. त्यामुळे ती घरखर्च भागविण्यासाठी नोकरी शोध म्हणून सतत नवऱ्याकडे तगादा लावत होती. यावरून दोघांमध्ये सतत भांडण होत होती. त्यातच १६ ऑक्टोबर रोजी बायको किचन मध्ये काम करत होती. त्यावेळी तिने नवऱ्याला घराच्या ओटीवर असलेला स्टूल आत आणून ठेवा, असं सांगितलं. त्यावेळी नवरा घरात बसला होता.
गळफास देऊन मारण्याचा केला प्रयत्न : मी निवांत बसलो की, तू मुद्दाम काम सांगून त्रास देतेस असं पतीनं म्हटलं. मी निवांत बसलेले तुला पाहवत नाही, असं बोलून बायकोशी वाद उकरून काढला. तर बायकोला लाथा बुक्क्यानी मारहाण करत आज तुला मी जिवंत सोडणार नाही, असं बोलत नवऱ्याने घरातील नायलाॅनची दोरी घेऊन ती बेडरूमच्या छताच्या पंख्याला बांधली. त्यानंतर बायकोला किचन मधून ओढून तिला स्टुलवर चढून पंख्याची दोरी नवऱ्याने तिच्या गळ्यात अडकवली. तसेच बायकोच्या पाया खालील स्टुल काढून घेऊन तिला गळफास देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
कल्याण पूर्व भागातील एका सोसायटीत राहत असलेल्या २३ वर्षांच्या पतीने आपल्या १९ वर्षांच्या पत्नीला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill wife) केला. ही महिला थोडक्यात बचावली आहे. तक्रारदार तनीषा जळगावहून परतल्यावर तिची कल्याण मधील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसापासून फरार पतीचा शोध सुरू आहे. तसेच आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक जळगाव गेले आहे. - जी.आर. बाबडे, पोलीस उपनिरीक्षक
जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : दोरीचा गळफास लागताच बायकोचा श्वास कोंडला. ती प्राण सोडत नाही म्हणून नवऱ्याने तिचे पाय पकडून तीन वेळा तिला फास घट्ट लागण्यासाठी वर खाली ओढले. त्यामुळे बायकोच्या मानेजवळची दोरी हाताने घट्ट पकडून ठेवली असल्याने ती वाचली, त्यानंतर पंख्याचा फास तोडून बायको खाली उतरली. मात्र तिच्या मानेला फासामुळे जखम झाली. या घटनेनंतर बायको जळगावला माहेरी निघून गेली होती. तेथे माहेरच्या नातेवाईकांनी तिच्या मानेवरील दुखापत पाहून विचारले असता, तिने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांच्या सांगण्यावरून पीडित बायकोने नवऱ्या विरोधात जळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने ती तक्रार तेथून मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) वर्ग करण्यात आली.
हेही वाचा -