ठाणे - धावपळीच्या जीवनात सणच काय तर घरी रोज एकत्र जेवणाची वेळही नशिबी येत नाही. मात्र, कुटुंबापासून दूर असलेल्या आणि ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत येथील परिचारिकांनी रक्षाबंधन, सण साजरा केला.
रुग्णालयात उपचार घेत असलेले किंवा कामानिमित्त घर सोडून बाहेर गेलेल्यांना आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेणे अशक्य आहे. संपूर्ण देशभरात रक्षाबंधन उत्सव साजरा केला जात असताना ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात एक आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव पाहायला मिळाला.
रुग्णालयाच्या परिचारिकांनी रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यात अशा काही परिचारिका होत्या, ज्यांना भाऊ नाहीत तर असे काही रुग्ण आहेत ज्यांचे नातेवाईक नाहीत. काही तर अनाथ होते. यावेळी अनेक रुग्णांना अश्रू अनावर झाले होते.