ठाणे - ठाण्यात विविध ठिकाणी फेरीवाले गर्दी करत आहेत. यामुळे पादचाऱ्यांना आणि वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे फेरीवाल्यांच्या विरोधात ठाणेकर एकवटले असून आयुक्तांना एक हजार पत्रे पाठवली आहेत.
वसंत विहार भागातील खेवरा सर्कल ते डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहापर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांनी संपूर्ण रस्ता वेढला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी यांना चालण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील मोठा फटका बसत आहे. याविषयी अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे करून देखील महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक नागरिक आणि आसपासच्या सोसायटीतील रहिवासीयांनी आंदोलनाची आगळी-वेगळी शक्कल लढवली आहे. सर्व स्थानिक रहिवासीयांनी १ हजार ५२ पत्र पालिका आयुक्तांच्या नावाने लिहून ते पोस्टाद्वारे पाठवली आहेत.
आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या पत्रांमध्ये फेरीवाल्यांमुळे होणारा त्रास आणि स्थानिकांच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. मात्र, आता तरी आयुक्त किंवा पालिका प्रशासन पत्रांद्वारे केलेल्या तक्रारींची तरी दखल घेतील का आणि स्थानिकांना मोकळा श्वास मिळतोय का हे पाहणे औत्युक्याचे राहणार आहे.