ठाणे Swapnil Kanade Murder Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत गुंड स्वप्निल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यातच ३ ते ४ जणांच्या हल्लेखोर टोळीनं आज पहाटेच्या ४ ते ५ वाजल्याच्या सुमारास उल्हासनगर शहरातील एसएसटी कॉलेज लगत असलेल्या सतगुरु वॉशिंग सेन्टरच्या मागे झाडाझुडपात नेऊन स्वप्निलवर हल्ला केला. ह्या हल्ल्यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आलंय. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी फरार हल्लेखोर टोळीचा शोध सुरू केला आहे.
हत्येचा गुन्हा दाखल: स्वप्निल हा सराईत गुन्हेगार असून अनेकांसोबत त्याचे वैर होते. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपींनी पहाटेच्या सुमारास माणेरे गावातील रस्त्यावर असलेल्या सतगुरु वॉशिंगच्या मागे स्वप्निलला गाठून लाकडी दांडक्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याचे पाहून हल्लेखोर टोळीतील ४ ते ५ गुंड घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
व्यापारी आणि नागरिकांमध्ये दहशत: उल्हासनगर शहराची उद्योग नगरी म्हणून ओळख आहे. मात्र, आता हे शहर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकल्याने येथील व्यापारी व नागरिक या गुंड टोळीचा बंदोबस्त करा, अशी मागणी करीत आहेत. दुसरीकडे स्वप्निल कानडे या सराईत गुंडाची आज रविवारी पहाटेच्या सुमारास हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपींची चौकशी सुरू: या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्याशी संपर्क साधला असता, आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून या हत्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस पथकासह उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तर काही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. यापूर्वीही पूर्व वैमनस्यातून गुंडांनी गुंडाची हत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुंडांमध्ये चालणारे टोळीयुद्ध पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.
हेही वाचा: