ठाणे - महाराष्ट्रातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत कोणत्याही मतदार संघातून उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याची माहिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी दिली. पुणेकर कल्याणात कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संपूर्ण देशभरातील विविध राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका चार टप्प्यात घेण्यात येणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात करून देशाचे नेतृत्व करण्यासाठी आपला उमेदवार कसा निवडून येईल, याकरिता फोडा फोडीच्या राजकारणाला उत आला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील सिनेतारकांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाणार आहे. यंदा काँग्रेस पक्षाने उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील लावणी सुरेखा पुणेकर यांच्या नावाची देखील पुणे मतदार संघात चर्चा होती. लोककलेच्या माध्यमातून देश विदेशात नावलौकिक मिळवून लावणीला साता समुद्रापालिकडे नेणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा महाराष्ट्रात मोठे नाव कमावले असून त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ऐनवेळी सुरेखा पुणेकर यांच्याऐवजी मोहन जोशी यांना उमेदवारी घोषित केल्याने पुणेकर यांच्या नावाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला.
गुरुवारी सुरेखा पुणेकर कल्याणातील अत्रे नाट्य मंदिरात त्याच्या नटरंगी नार या लावणीच्या कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांना पत्रकारांनी लोकसभेच्या उमेदवारी बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून अवधी असल्याने भाजप शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी या कोणत्याही राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील कोणत्याही लोकसभेच्या मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्यास मी निवडणुकीला उभी राहण्यास तयार असल्याची माहिती दिली. लोककलेचा सरकारी दरबारी आवाज उठविण्यासाठी आणि लोककलावटणाचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी लोककलावंतांचे प्रश्न मांडण्यासाठी आपली दखल घेत उमेदवारी जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी या वेळी केली .