ठाणे - शहरातील 148 तर, ठाणे आणि मुंब्रा-कळवा मतदारसंघातील 149 गोविंदा पथकांनी जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र ही सण, उत्सवांची भूमी आहे. या भूमितील सण, उत्सव साजरे झालेच पाहिजेत. मात्र, दहिहंडीच्या उत्सवावर निर्बंध आणले जात आहेत. त्यामुळे या दोघांच्या विजयासाठी कितीही 'थर' लावण्यास तयार आहोत, अशी भूमिका गोविंदा पथकांनी घेलली.
यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी सांगितले की, आनंद दिघे यांनी दहिहंडीची परंपरा येथे रुजवली. त्यानंतर मराठी मातीतील हा सण सातासमुद्रापार नेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी परिश्रम घेतले. आमच्या सारख्या मध्यमवर्गीय तरुणांना स्पेनच्या कॅसलर्स बरोबर ताठ मानेने उभे केले. मात्र, न्यायालयाच्या आदेशाने या मराठी मातीतील खेळावर निर्बंध आले. त्या विरोधात आव्हाड आणि अविनाश जाधव यांनी लढा दिला. जितेंद्र आव्हाड यांच्या साथीने दहिहंडी आणि गोविंदा पथकांमधील ऊर्जा जीवंत ठेवण्याचे काम अविनाश जाधव हे करत आहेत. न्यायालयाने लादलेले कडक निर्बंध आणि ते न पाळल्यास दाखल होणारे गुन्हे याची तमा न बाळगता जाधव हे नौपाड्यात दहिहंडीची उभारणी करून गोविंदा पथकांना जिवंत ठेवत आहेत. ते कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात याच्याशी गोविंदा पथकांना काही देणं-घेणं नाही. ते आमच्यासाठी लढतात, मराठी सण आणि संस्कृती टिकवण्यासाठी लढतात, हे महत्वाचे आहे.
म्हणूनच आम्ही सर्व गोविंदा पथके अविनाश जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांच्या पााठीशी उभे राहिलो आहोत. आमचा पाठिंबा हा केवळ दिखाव्याचा नाही, तर आम्ही सर्व गोविंदा प्रचारासाठी बाहेर पडणार आहोत. या दोघांच्या विजयासाठी परिश्रमाचे कितीही थर लावण्याची आमची तयारी आहे. मराठी सण वाचविण्यासाठी अविनाश जाधव यांच्या पाठीशी तमाम मराठीजण उभे राहतील, असा विश्वासही यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी व्यक्त केला.
हेही वाचा - ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी ; खड्डा चुकवताना झाला अपघात
यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान अविनाश जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचे आगमन झाले. त्यावेळी गोविंदा पथकाच्या प्रमुखांनी जाधव यांचा सत्कार करून निवडणुकीत सक्रीय पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
यावेळी ठाण्याचा राजा गोविंदा पथकाचे राकेश यादव, सार्वजनिक गोकुळ अष्टमी उत्सव खोपटचे अमित पेंढारे, सह्याद्री गोविंदा पथकाचे संदीप दळवी, सांस्कृतिक गोविंदा पथकाचे आप्पा जाधव, गणेश गोविंदा पथकाचे दिपेश दळवी, जय मल्हार गोविंदा पथकाचे निहार नलावडे, अलंकार गोविंदा पथकाचे विक्रांत चव्हाण, एक संघर्ष मित्र मंडळाचे कल्पेश मिठबावकर, जय वीर हनुमान गोविंदा पथकाचे निनाद ढापले, श्री कृष्णा गोविंदा पथकाचे दिनेश मांडवकर, टेकडीचा राजा गोविंदा पथकाचे समीर गावसकर हे यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबई येथील जय जवान गोविंदा पथकाचे प्रमुख हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांकडून आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली, म्हणाले 'हे' एकच आश्वासन दिले नाही