ठाणे - कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील विविध समाजाची धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 'लॉकडाऊन' करण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील सुन्नी जामा मशीद देखील बंद करण्याचा निर्णय ट्रस्टकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गुरुवारपासूनच मशिदीतील सार्वजनिक नमाज पठण बंद करून मशिद 'लॉकडाऊन' करण्यात आली आहे.
हेही वाचा... लॉक डाऊन : रत्ने आणि मौल्यवान परिषद कर्मचाऱ्यांना देणार ५० कोटींचा निधी
शुक्रवारी म्हणजे जुम्माच्या नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव शेकडोच्या संख्येने मशिदीमध्ये एकत्रित येतात. मात्र, कोरोनामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार देशभरात 'लॉकडाऊन'ची घोषणा केली आहे. यामध्ये शाळा-कॉलेज, मॉल, थिएटर, सर्व धर्मियांची धार्मिक व प्रार्थनास्थळे आदी ठिकाणे बंद करून संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळेच नमाज अदा करण्यासाठी मशिदीत मुस्लीम बांधवानी येऊ नये, त्यांनी आपल्या घरीच नमाज पठण करावे, अशा सूचना सुन्नी जामा मशिदीच्या ट्रस्टकडून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा... #CORONA : मशीद बंद ! कॅम्प भागातील इराणी इमाम वाडा मशीद ट्रस्टचा निर्णय
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही राज्य सरकारच्या वतीने मुस्लीम समाजाला आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मशिदीत नमाज पठण करण्यास न जाता घरीच नमाज अदा करण्याची विनंती केली आहे. तर दुसरीकडे संचारबंदी व 'लॉकडाऊन' असेपर्यत जिल्ह्यातील सर्वच धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद करण्याचे निर्देश जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहे. याच निर्देशाचे पालन करीत सुन्नी जामा मस्जिद 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय घेतल्याचे जामा मस्जिद ट्रस्टचे खजिनदार मुझ्झफर कोतवाल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.